गप्पागोष्टी - आनंदी बालभवन फाऊंडेशन कोल्हापूर

Go to content
अबडक तबडक तडाड तुडूम
घडणं बिडणं कडाड कुडूम
नाटक बीटक च्याव च्याव चूम
गोष्टरंग बुंग बॅंग बुंग!!!
गोष्टरंग बुंग बँग बुंग!!!
गोष्टरंगची टीम येणार आहे म्हटल्यावरच आनंदी बालभवनमध्ये  उत्साह संचारलेला असतो. सगळी मुले खूप आनंदात असतात. मावशी, गोष्टरंगची टीम कधी येणारे? किती गोष्टी असणारेत? अशी विचारणा  मला बरेच वेळा झाली होतीच.  आनंदी बालभवन फाउंडेशनमध्ये ९ डिसेंबर २०२४ सोमवारी गोष्टरंगचे प्रयोग पार पडले. यावर्षीच्या टीमने खास ३ ते ६  या वयोगटातील मुलांसाठी 🎋बांबू 🎋 (निर्मिती - QUEST, दिग्दर्शन - आशा) पहिली ते चौथीच्या मुलांसाठी 👧मी तर 🐈 आहे (कथा gरिनचिन, चित्रे - जितेन्द्र ठाकूर, हिंदी अनुवाद - जितेन्द्र जोशी, प्रकाशन - एकलव्य ) आणि पाचवी ते सातवीच्या मुलांसाठी👩‍🍼 आई आणि मी👧( कथा - ममता नैनी, रेखाचित्र - संकेत पेठकर, मराठी अनुवाद - सुजाता देशमुख, प्रकाशन - एकलव्य) ही तीन नाटुकली सादर केली. यावेळी गोष्टी सादर करण्यासाठी रत्नागिरीचे सचिन दादा, नांदेडची सायली ताई आणि नंदुरबारचे गणेश दादा आले होते.

बांबूची गोष्ट सादर झाली तेव्हा मुलांनी खूप आनंद घेतला. खरं तर एकही शब्द या गोष्टीत नाही पण मुलं खूप जास्त शब्द बोलतात ही गोष्ट सादर होताना. खूप काही काही कल्पना करतात आणि भरभरुन बोलतात. खूप जास्त ताकत आहे या गोष्टीत खास या वयोगटाने बोलण्यासाठी हे मला जाणवलं.

गोष्टरंगची टीम  बांबूचा वापर करून वेगवेगळे  प्रसंग मुलांसमोर सादर करत होती आणि जे सादरीकरण होत होतं ते काय आहे हे मुलं पटापट ओळखत होती. आणि हे अनुभवताना मुलांना खूप मजा  येत होती. त्यांचे अंदाज ही बरोबर लागत होते शिवाय त्याच्यामध्ये काही खेळही होते. ते खेळ खेळताना मुलांना भारी वाटत होतं. बालभवनमध्ये अक्षरशः हे खेळ खेळण्यासाठी भली मोठी रांगच लागली होती आणि त्यांना खूप खेळायचं होतं. अजिबात थांबायचं नव्हतं. Theatre for earlier साठी अशी खूप नाटुकली व्हायला हवीत असे वाटले. QUEST  special Thanks for  🎋
    

दुसरी गोष्ट होती मी तर 🐈 आहे. ही गोष्ट खूप भन्नाट पद्धतीने सादर केली. खरं तर ही गणिताची गोष्ट. गणितातला खूप महत्त्वाचा भाग अपूर्णांक.  टिंटीच्या माध्यमातून किती छान गोष्ट लिहिली आहे आणि ती इतक्या सुंदर पद्धतीने सादर केली आहे की कोठेही मांजर पाहिले की पहिल्यांदा टिंटीच आठवेल. नकळत मांजराच्या किती नोंदी आहेत या गोष्टीत. पाहताना मज्जा तर येतेच पण हम्म असं करतं का मांजर! असा विचार ही मुलांच्या मनात येऊन जात असेल असं वाटलं.
जर मुलाला अपूर्णांक शिकवायचा असेल तर या गोष्टीपासून सुरुवात करायला काय हरकत आहे असा एक विचार मनात येऊन गेला. तीन पाव, अर्धा, पाव आणि शून्य मांजर. तर टिंटी शेवटी मांजर झाली का? असा प्रश्न विचारल्यावर मुले काहीसा विचार करुन बरोबर उत्तर नक्की देतात. काही मुलांनी पुढे येऊन आजी, मांजर, टिंटी अशी पात्रंही साकारली.
गणेश दादा टिंटी झाला होता आणि तो मुलगा असूनही मुलगी कसा झाला अशी प्रश्नार्थक मुद्रा  काही मुलांच्या चेहर्‍यावर उमटली होती. काही मुलांना हे वेगळं वाटत होतं.काही मुलं मांजर झाली होती आणि गणेश दादा उंदीर झाला होता आणि मुले त्याला पकडत होती हा खेळ खेळतानाही  मुलांना मजा आली. जेव्हा मी तर 🐈 आहे या गाण्याचे सादरीकरण सुरू होतं तेव्हा एक मुलगा तिथे जाऊन तो पण  डान्स करायला लागला.  
     

तिसरं नाटक होतं 👩‍🍼 आई आणि मी👧.  हे नाटक थोडसं गंभीर होतं. आम्ही आधीच पालकांना सूचना दिली होती की लहान मुलं असतील तर या नाटकाला नाही बसलं तरी चालेल. काही पालकांनी दोनच नाटुकली पाहिली. तिसऱ्या नाटुकल्याला  काही पालक लहान मुलांना घेऊन हे नाटक पाहायला बसले होते.  बालभवनमध्ये ३ ते १२ या वयोगटातल्या मुलांसाठी काम केलं जातं. पण विशेष म्हणजे ३ ते ८ या वयोगटातील ही मुलं आणि त्यांचे पालक या हे नाटुकलं पहायला बसले होते. पहिली दोन नाटुकली या लहान मुलांनी आस्वाद घेत पाहिली, मजा केली. तेवढ्याच गंभीरपणे, शांतपणे, दंगा न करता मुलांनी तिसरं नाटुकलं पाहिलं. आद्या त्यांच्या चांगलीच लक्षात राहिली. हे सादरीकरण सुरु असताना वातावरण शांत झालं होतं, स्तब्धता पसरली होती. दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा  या गोष्टीवर चर्चा केली तेव्हा आमच्या लक्षात आलं की त्यातले बरेच प्रसंग  मुलांपर्यंत पोहोचले आहेत. याचं आम्हाला ही विशेष कौतुक वाटलं.
  
बालभवनमध्ये बालसाहित्यावर जाणीव पूर्वक काम केलं जातं. मुलांच्या तोंडी भाषेचा विकास व्हावा, मुलांच्या लेखी भाषेचा विकास व्हावा, त्यासोबत भावनिक विकास व्हावा यासाठी आम्ही विशेष काम करतो आहोत पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुलं खूप भरभरून बोलत आहेत याची  आम्हाला प्रचिती आली.
तुम्ही कोणते खेळ बालभवनमध्ये खेळता? असा प्रश्न विचारला असता    गोल्डन फिश,शिरा पुरी,  डोंगर का पाणी, सूसरीचे तळे खेळतो अशा खूप खूप खेळांची नावे मुलांनी सांगितली. या वेळी खूप बोलली मुलं.  बालसाहित्यासोबत जर मूल वाढलं तर त्याचा खूप चांगला परिणाम दिसून येतो. मूल बोलकं होतं, स्वतःचा  विचार करायला लागतं  याचा प्रत्यय आम्हाला पुन्हा पुन्हा येतो आहे.
   

गोष्टरंगची टीम अभिनयात अव्वल असतेच असते. बऱ्याच  पालकांनीही कार्यक्रम खूप सुंदर झाला. आम्हाला कार्यक्रम आवडला असे आवर्जून अभिप्राय नोंदवले.

सचिन दादा, सायली ताई आणि गणेश दादा खूप सुंदर सादरीकरण केले तुम्ही सर्वांनी. तुम्हा तिघांना, निनादला आणि गोष्टरंग टीमला मनापासून धन्यवाद.

दीप्ती देशपांडे,
१३ डिसेंबर, २०२४
Back to content